मुंबई : 'पेंग्विन'च्या आगमनानंतर मुंबईतील राणीच्या बागेत पर्यटकांची ये-जा वाढली आहे. भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी केलेल्या खर्चापैकी 25 टक्के खर्चाची गेल्या दोन वर्षात वसुली झाली आहे.
राणीच्या बागेत 17 अद्ययावत पिंजऱ्यांची उभारणी सुरु असून लवकरच आणखी प्राण्यांचं आगमन उद्यानात होणार आहे. सध्या दररोज सुमारे दहा हजार, तर सुट्टीच्या दिवशी सुमारे 20 हजार पर्यटक पेंग्विन कक्षासह 'राणीची बाग' बघण्यासाठी येतात.
पेंग्विन पक्षांसाठी अनुकूल वातावरण असणारा पेंग्विन कक्ष आणि त्याला अनुरुप असा सभोवतालचा परिसर करण्यासाठी महापालिकेने सुमारे 45 कोटी रुपये एवढा खर्च केला होता. तसेच या कक्षाचा वार्षिक परिरक्षण खर्च (Maintenance) सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे.
गेल्या सुमारे दोन वर्षात प्रवेश शुल्कापोटी महापालिकेकडे सुमारे 15 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे लक्षात घेता पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी आणि परिरक्षणासाठी महापालिकेने आतापर्यंत खर्च केलेल्या रकमेपैकी सुमारे 25 टक्के रक्कम वसूल झाली आहे. याच रकमेतून राणीच्या बागेतील सोयी सुविधा अधिकाधिक अद्ययावत आणि कालसुसंगत करण्यात येत आहेत.