मुंबई : मराठा आरक्षणावरुन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छत्रपती संभाजी राजेंवर टीका केली होती. या टीकेनंतर संभाजी राजेंचे सचिव आक्रमक झाले. संभाजी राजेंचे सचिव योगेश केदार यांनी थेट फोन करुन रामदास कदम यांच्याशी वाद घातला आणि राजेंवर टीका केल्याबद्दल जाब विचारला. केदार आणि कदम यांच्यात झालेल्या वादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी राजेंनी नारायण राणेंचं वैभववाडीच्या कार्यक्रमात कौतुक केलं होतं. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणासाठी झटलेला खराखुरा नेता असं म्हणत आरक्षणाचं श्रेय संभाजी राजेंनी नारायण राणेंना दिलं होतं. नारायण राणेंनी धाडसी निर्णय घेत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावं यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले. त्यामुळे मराठा समाजाला आज जे आरक्षण मिळालं आहे त्याचा निर्णय घेण्याचं खरं धाडस नारायण राणे यांनी केलं होतं, अशा शब्दात संभाजी राजेंनी राणेंचं कौतुक केलं.


संभाजी राजेंनी राणेंचं केलेलं कौतुक रामदास कदम यांना आवडलं नाही. संभाजी राजेंसारख्या व्यक्तीनं कुणासमोर लाचारी पत्करु नये. हेतूपुरस्कर कुणा एखाद्या व्यक्तीला मोठं करणं हे काम राजेंचं नाही, असं माझा प्रामाणिक मत असल्याचं रामदास कदमांनी सांगितलं. छत्रपतींच्या गादीला आम्ही नमस्कार करत असतो. त्यामुळे तुमचं स्थान मोठं आहे. त्यामुळे कोणतंही वक्तव्य करत असताना आधी अभ्यास करणं गरजेचं आहे, असं आवाहन रामदास कदमांनी संभाजी राजेंना केलं होतं.