मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील बेस्टचे 30 हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसची वाहतूक ठप्प झाली आहे. याचाच फायदा टॅक्सीचालक आणि खासगी बसचालक घेत आहेत. चौपट दर आकारुन मुंबईकरांची अक्षरश: पिळवणूक सुरु आहे. तर दुसरीकडे संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे. एकूण 40 एसटी सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत.

बेस्टचा संप, टॅक्सीचालकांची मुजोरी

बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळत आहेत. टॅक्सीचालक प्रवाशांकडून चौपट दर वसूल करत आहेत. मीटर किंवा शेअर टॅक्सीच्या दरांऐवजी प्रतिप्रवासी भाडे आकारणी करुन मुंबईकरांची पिळवणूक सुरु आहे. भायखळा ते जेजे ब्रीज या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल 80 रुपये भाडं आकारलं जात आहे. शिवाय खाजगी बसही जादा पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्यामुळे अनेकजण जवळच्या प्रवासासाठी लिफ्ट घेऊन प्रवास करत आहेत.

मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प

बेस्ट संपाच्या पाश्वभूमीवर एसटी मुंबईकरांच्या मदतीला

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून 40 बस रस्त्यावर उतरवल्या आहेत.

कुर्ला पश्चिम ते बांद्रा -05 बस

कुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 बस

दादर ते मंत्रालय - 05 बस

पनवेल ते मंत्रालय - 05 बस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय - 05 बस

ठाणे ते  मंत्रालय - 15 बस

अशा एकूण 40 बस सध्या रस्त्यावर धावत आहेत, गरजेनुसार आणखी जादा बस सोडण्यात येतील, असं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारच्या योजना कामगारविरोधी, विविध संघटनांचा देशव्यापी बंद

बेस्ट कर्मचारी संपावर


वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीच हजेरी लावली नाही.


लोकल रेल्वेनंतर 'बेस्ट' बस हा मुंबईकरांच्या प्रवासाचा दुसरा मोठा पर्याय आहे. मात्र गेली अनेक वर्ष बेस्ट संकटात आहे. बेस्टला मुंबई महापालिकेकडून आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बेस्टला आश्वासन दिलं होतं ते ही पूर्ण केलं नाही. त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं.


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या


- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी