मुंबई : युतीच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्याने घटकपक्षांनी बंडाचं हत्यार उपसल्याचं बोललं जात होतं. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज आमच्या चारही अपक्ष नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचं ठरल्याचं आठवलेंनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना-भाजप आमदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर स्नेहभोजनाचं निमंत्रण नसलेल्या युतीतल्या घटकपक्षांनी चहापानाचं आयोजन केलं होतं. या चहापानाच्या कार्यक्रमाला रासप नेते आणि मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे उपस्थित होते.


घटकपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत 25 तर लोकसभेसाठी 3 जागा मिळाल्या पाहिजेत. तसेच सत्तेत 10 टक्के सहभाग मिळायला हवा. महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्याचे दरवाजे युतीमुळे खुले झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता दोघांच्याही कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली.


शिवसेना-भाजपने एकत्र येत असताना आम्हाला विचारात घ्यायला हवे होते, त्यामुळे आमची नाराजी होती. आम्ही भाजपा-शिवसेनेसोबत राहणार आहोत, मात्र आम्हाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. रिपाइंला एक मंत्री पद देण्याचं आश्वासन अजूनही पूर्ण केलेलं नाही, याची आठवण आठवलेंनी करून दिली.


राज्यात युतीचं सरकार आलं तर चार घटकपक्षांना 5 मंत्रीपदे द्यावीत. राज्यात सरकारचे काही महिने उरले आहेत. या काही महिन्यांमध्ये आमची नाराजी दूर करावी. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा होईल, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.


युतीच्या स्नेहभोजनाला गैरहजेरीबद्दल बोतलाना आठवले म्हणाले की, मला स्नेहभोजनाचे निमंत्रण नव्हते आणि असते तरी मी गेलो नसतो. मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून स्नेहभोजनाला उपस्थित होते. मात्र मी खासदार असूनही स्नेह भोजनाला नाही, अशी खंत आठवलेंनी बोलून दाखवली.