मुंबई : राज्यात 44 लाखांहून अधिक बोगस मतदार असल्याची गंभीर तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज निवडणूक आयोगाकडे केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले होते.
याप्रसंगी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही गंभीर बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. राज्यात एकूण 44 लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावे एकाहून अधिक वेळा मतदार यादीमध्ये नोंदवली गेल्याची बाब काँग्रेसने आयोगासमोर पुराव्यानिशी मांडली. मागील अनेक महिने मतदार यादीचा अभ्यास केल्यानंतर काँग्रेसने बुथनिहाय राज्यातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघात एकाहून अधिक वेळा नोंदणी असलेली 44 लाखांहून अधिक मतदारांची यादी तयार केली आहे.
ही यादीच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्र व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांना सादर केली. ही बाब अतिशय गंभीर असून याद्वारे निष्पक्ष मतदान प्रक्रियेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने या नावांची छाननी करुन त्यांना मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे.