ठाणे : शिवसेना-भाजप युतीची अधिकृत घोषणा झाली असली, तरीही गेल्या साडेचार वर्षात असलेला भाजप-सेनेतील वाद काही मिटताना दिसत नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ मेरीटनुसार भाजपला दिला पाहिजे, जर शिवसेनेला ही जागा दिलीच, तर विद्यमान खासदार राजन विचारे उमेदवार नकोत, असा पवित्रा ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी घेतला आहे.
शिवसेनेने राजन विचारेंना उमेदवारी दिली, तर ठाण्यातील एकही भाजप कार्यकर्ता किंवा पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत सेनेला मदत करणार नाही, असा थेट इशारा ठाणे स्थानिक भाजप कार्यकारिणी आणि नगरसेवकांनी दिला आहे. अशा आशयाचं पत्रच ठाणे महापालिका भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिलं आहे. त्यामुळे ठाण्यात सेना-भाजपचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गेले कित्येक दिवस सेना-भाजपच्या वादाच्या चर्चेने ठाण्यात जोर धरला होता मात्र आता उघडपणे भाजपने खासदार राजन विचारे यांना विरोध केल्याने युतीची ठाणे लोकसभा मतदारसंघातील जागा धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.
युती झाली तरीही सेना भाजपमधील धुसफूस संपलेली नाही. गेली साडेचार वर्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या सेना-भाजपची दिलजमाई कधी आणि कशी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
ठाण्याची उमेदवारी सेना खासदार राजन विचारेंना नको, भाजप नगरसेवकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2019 09:02 PM (IST)
शिवसेनेने राजन विचारेंना उमेदवारी दिली, तर ठाण्यातील एकही भाजप कार्यकर्ता किंवा पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत सेनेला मदत करणार नाही, असा थेट इशारा ठाणे स्थानिक भाजप कार्यकारिणी आणि नगरसेवकांनी दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -