मुंबई: ‘एबीपी माझा’ने ‘देशाचा मूड’ या सर्वेक्षणात वर्तवलेल्या अंदाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. जर लोकसभेला शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना होऊन, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचं भाष्य केलं.


एबीपी माझाने ‘देशाचा मूड’मध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यास, लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी यूपीएला 30, एनडीए अर्थात भाजप आणि शिवसेना सोडून अन्य मित्रपक्षांना – 16 जागा आणि शिवसेनेला केवळ 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास आणि एनडीए (भाजप आणि शिवसेना) एकत्र लढल्यास - लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी एनडीए - 36 यूपीए – 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

हिंदुस्थान टाईम्सच्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले, “जर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत असेल आणि शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा फटका आम्हा दोघांनाही (भाजप-शिवसेना) बसेल. मतांचं विभाजन होईल. त्यामुळे विरोधी पक्षांना त्याचा फायदा होईल. आम्हाला फटका बसेलच पण शिवसेनेला जास्त फटका बसेल. त्यामुळे युती करुन निवडणुकीला सामोरं जाणं फायद्याचं ठरेल.

आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. जर आम्ही स्वतंत्र लढलो तर आमच्या 3-4 जागा इकडे-तिकडे कमी होतील. पण सध्याच्या घडीला देशपातळीवर युती टिकवणं आवश्यक आहे. शिवसेना आमचा जुना मित्र आहे, आमची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे युती गरजेची आहे”

स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेला कसं मनवणार?

या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “राजकीय परिस्थिती लोकांना त्या त्या वेळी पटवून देत असते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी मायावतींच्या बसपाला संपवायला निघाली होती. तेच भविष्यात एकत्र येतील याचा कुणी विचार केला होता का? बिहारमध्येही तसंच घडलं. त्यापेक्षा मोठं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबतची आघाडी तोडून त्यांच्याविरोधातच निवडणूक लढवली. पण निकालानंतर काँग्रेससोबत आघाडी करुन ते सत्तेत एकत्र आले. त्यामुळे राजकारण आणि राजकीय स्थिती बदलत असते. आमच्याबाबतही तेच होईल.

संबंधित बातम्या 

देशाचा मूड : काय आहे देशाचा मूड?  

मूड देशाचा : आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठा धक्का?