मुंबई : रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितांच्या शैलीतून पुन्हा एकदा यथेच्छ फटकेबाजी केली आहे. आठवले कोण आहे, आठवले माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे, असं म्हणत आठवलेंनी उपस्थितांवर गारुड घातलं.


 
रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते. कार्यक्रमात सत्कारानंतर रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत भाषण केलं.

 
या भाषणात त्यांनी आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्त्व दिलं जावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना केंद्राकडून अडीच लाख दिले जात होते. त्यात 50 हजाराची वाढ करु असं आश्वासनही रामदास आठवलेंनी दिलं आहे. कोपर्डीतील आरोपींना रिपाइं कार्यकर्त्यांनी पकडून दिलं, असंही आठवले म्हणाले. अॅट्रॉसिटी कायद्याचं समर्थन करताना हा कोणावरही अन्याय करणारा कायदा नाही, असा दावा रामदास आठवलेंनी केला.

 

 

आठवलेंच्या काही कविता :
मंत्रिपद मिळाले मला
ते मिळवायचंही आहे, कारण माझ्यात आहे कला
म्हणून हा समाज इथे आला
कारण मी आहे सच्चा भीमवाला

रामदास आठवले कोण आहे
काही लोक म्हणतात,
आठवले कोण आहे
तो माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे
आठवले कोण आहे
तो तर दलित चळवळीचा बोन आहे

 
फेसबुकवर माझ्याबद्दल अनेकांनी कविता टाकल्या
पण माझं मंत्रिपद बघून अनेकांच्या भुवया वाकल्या
माझं मंत्रिपद बघून अनेकांनी आपल्या टोपल्या झाकल्या

 
अरे मला नको आहे तुझं हारातलं फूल
मला हवं आहे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारं मूल
मला हवं आहे जाती धर्माला जोडणारा पूल
मी कधीच कुणाला देत नाही हूल
पण मी घालवून टाकलं काँग्रेसचं झूल