शिवसेनेकडे गृहखातं असल्यास गुंडांवर वचक : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 12:35 PM (IST)
मुंबई : पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेने गृहखात्यासाठी पूर्णवेळ मंत्री द्यावा अशी मागणी उचलून धरली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडे गृहखातं असतं तर गुंडांवर दहशत बसली असती असा दावाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पोलिसांवर हल्ल्याची प्रकरणं वाढली आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री सक्षम आहेत, त्यांचा आदर करतो, पण गृह खात्यावर 24 तास काम करणारी व्यक्ती हवी, अशी अपेक्षा त्यांनी भाजपकडून केली आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पूर्णवेळ गृहमंत्री देण्याची मागणी केली आहे. आता युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनच ती मागणी आल्यानं आता तरी मुख्यमंत्री गृहखात्याचा मोह टाळून त्यासाठी स्वतंत्र मंत्र्यांची नेमणूक करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.