मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील राममंदिर स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात भाजप, शिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली.
भाषण सुरु होऊनही घोषणाबाजी न थांबल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना संताप अनावर झाला. भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या नावाची घोषणाबाजी करण्यात येत होती. मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, अशी टिप्पणी रावते यांनी केली. शिवाय भाजप कार्यकर्ते बोलू देत नसल्याचं सांगत रावते माईक सोडून निघून गेले.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून राममंदिर हे नवं स्टेशन तयार झालं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनासाठी व्यासपीठावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, रविंद्र वायकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कार्यक्रम सुरु होताच बजरंग दलाचे कार्यकर्ते, भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी सुरु केली. सुरेश प्रभूंनीही कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं.
दरम्यान या स्टेशनला राममंदिर नाव मिळण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले असं सांगायलाही गजानन कीर्तिकर विसरले नाहीत. आपण स्वतः लोकसभेत हा मुद्दा मांडला होता, असं कीर्तिकर म्हणाले.
राम मंदिर या स्थानकाच्या नावावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. आधी ओशिवरा असं या स्थानकाचं नाव असेल अशी माहिती मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वी या स्थानकाचं नाव राम मंदिर ठेवून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही सरकारकडून निश्चित करण्यात आला.