सुरतचा कोट्यधीश चहावाला भजियावालाच्या संपत्तीचं ठाणे कनेक्शन?
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2016 02:44 PM (IST)
सुरत : सुरतमधला चहावाला किशोर भजियावालाच्या घबाडाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. भजियावालाकडे ज्या 16 लॉकरच्या किल्ल्या सापडल्या त्यापैकी एक लॉकर ठाण्यातील रुघाणी नावाच्या व्यक्तीचा आहे. रुघाणीच्या लॉकरमध्ये 90 लाख रुपये आढळून आले आहेत. त्यामुळे रुघाणी आणि भजियावालाचं नेमकं काय कनेक्शन आहे याचा तपास आयकर विभाग करत आहे. किशोर भजियावालाकडे 16 लॉकरच्या किल्ल्या सापडल्या होत्या, त्यापैकी दोन त्याचे स्वतःचे तर 14 इतरांचे लॉकर्स आहेत. काही दिवसांपूर्वी भजियावालाकडे 650 कोटींची संपत्ती आढळली होती. चहाविक्रेत्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्यामुळे सारेच चक्रावले होते. मात्र पेशाने चहावाला असला, तरी भजियावाला सावकारी करत असल्याची माहितीही समोर आली आहे. सुरतमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत आयकर विभाग भजियावालाच्या घबाडाच्या तपासासाठी पोहोचलं, त्यानंतर एकामागोमाग एक असे 16 लॉकर सापडले. यामध्ये नोटांचे बंडल, सोन्याची बिस्किटं आणि दागिनेही होते.