मुंबई : वाद टाळण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची मुदतीच्या काही काळ आधी उचलबांगडी केली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्याने मारियांना हटवण्यात आल्याबाबत होत असलेल्या दाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे.


'त्यावेळी दोन-तीन वाद निर्माण झाले होते. ललित मोदी प्रकरणी मारियांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्ही मान्य केलं. शीना बोरा हत्या प्रकरणात मारियांनी जास्त रस घेतल्यामुळे पोलिस आयुक्त या केसमध्ये इतका इंटरेस्ट का घेत आहे, असे सवाल उपस्थित झाले.' असं मुख्यमंत्री म्हणाले.

'मारियांना तपासकार्यात कुतूहल असतं, त्यामुळे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याचा विचार करत आम्ही इतर शक्यता फेटाळून लावल्या' पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शीना बोरा हत्याकांडा संदर्भातल्या अनेक महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे.

तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची बदली नाही, तर महासंचालकपदी बढती झाली. ठराविक कालावधीच्या काही काळ आधी एखाद्या आयुक्ताची बदली होण्यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले.

'बढतीनंतर शीना बोरा हत्या प्रकरणात लक्ष घालण्याची मुभा मारियांना देण्यात आली होती. त्यावेळी पीटर मुखर्जींचा केसशी काहीच संबंध नसल्याचं मला सांगण्यात आलं. जोपर्यंत शीना हत्याकांडाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता, तोपर्यंत त्या पीटर मुखर्जीचा हत्येशी थेट संबंध नसल्याची माहिती मारियांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येत होती. मात्र कालातंरानं पीटर मुखर्जीला अटक झाली. तपासात पुढे आलेली माहिती माझ्यासाठी निश्चितच धक्कादायक होती' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

एप्रिल 2012 मध्ये 24 वर्षीय शीना बोराची तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचे पहिले पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शाम राय यांनी हत्या केल्याचा आरोप आहे.

मारिया या प्रकरणाचा तपास करत असतानाच त्यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं. गणपतीसाठी बंदोबस्ताचं कारण त्यावेळी पुढे करण्यात आलं. मारियांच्या बदलीनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी अहमद जावेद यांची वर्णी लागली.

संबंधित बातम्या :


...म्हणून राकेश मारियांची मुख्यमंत्र्यांकडून उचलबांगडी?


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांची सीबीआय चौकशी