कल्याण : भाऊबीजेच्या दिवशीच तीन चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणजवळच्या टिटवाळ्यात घडलेल्या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 16 वर्षीय साईनाथ भोईर, 13 वर्षीय नवीन भोईर आणि 9 वर्षीय साईनाथ संतोष भोईर 9 अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत.
दिवाळीची सुट्टी असल्यामुळे भोईर कुटुंबातील तीन भाऊ साईनाथ, नवीन आणि त्यांचा चुलतभाऊ साईनाथ दुपारच्या सुमारास वासुंद्री नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरलेले तिघेही पाण्यात बुडाले.
दुर्दैवाने त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्या तिन्ही भावांचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही मुलं घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता हा प्रकार समोर आला.
दुपारी साडेचारच्या सुमारास अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्यामुळे मुलांच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मृत्यूने कवटाळले तरी तिन्ही भावानी एकमेकांचा हात सोडला नव्हता. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तिघांचेही मृतदेह संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले.