मुंबई: अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करु शकणार का याचा निर्णय आता उद्या होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत कोर्टात अर्ज केला आहे. त्यावरील निकाल आज राखून ठेवण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत.
मुंबई सत्र न्यायालयात आज दिवसभर यावर युक्तीवाद करण्यात आला. एका निवडून आलेल्या आमदाराला मतदानासाठीचा अधिकार अबाधित आहे असा युक्तीवाद देशमुख आणि मलिकांच्या वतीनं करण्यात आला आहे. ईडीने या दोघांच्या याचिकेला जोरदार विरोध केला आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. आता सत्र न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला असून उद्या न्यायाधीश राहुल रोकडे पहिल्या सत्रात यावर निर्णय देणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातच मविआचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
ईडीचा विरोध
कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कसम 62 नुसार हा एक औपचारिक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना ही परवानगी देण्यात येऊ नये, असं ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात स्पष्ट केलं आहे. ईडीच्या या भुमिकेमुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मतदानाआधी महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण सहव्या जागेसाठी सध्या एक एत मताची जुळवाजुळव दोन्ही बाजूनं केली जात आहे.