Maharashtra MLC Election : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार  काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. 


काँग्रेसकडून विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली. काँग्रेसकडून मराठा आणि अनुसूचित जाती घटकातील उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 


मुंबई महापालिकेवर लक्ष?


मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठीची चाचपणीदेखील सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत मुंबई काँग्रेसला बळ देण्यासाठीच काँग्रेस नेतृत्वाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे. त्याशिवाय मागासवर्गीय घटकातील काँग्रेसचा चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. तर, कामगार नेते असलेल्या भाई जगताप यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. काँग्रेसमधील आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. 


चिंतन शिबिरातील संकल्प हवेतच? 


नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ठरवण्यात आले होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीत हे चित्र दिसून आले नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोघेही 65 वर्षांचे आहेत. 


भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा


राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. प्रसाद लाड हे पाचवे उमेदवार असणार आहेत.


शिवसेनेकडून अहिर, पाडवी यांना संधी


विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. आमश्या पाडवी हे शिवसेनेचे नंदूरबार जिल्हा प्रमुख आहेत. तर, सचिन अहिर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. 


संख्याबळ किती?


विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. म्हणजे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत.