मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीला तीन दिवस राहिले असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित करण्यात आलं आहे. सध्या एकत्रित राहा, राज्यसभेची निवडणूक जिंकल्यावर मुंबईत पार्टी करु असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी भक्कम असल्याचा विश्वास राज्यसभेची निवडणूक होणं ही विचित्र गोष्ट, आतापर्यंतची परंपरा भाजपने मोडली. महाराष्ट्रात षडयंत्र रचलं जातयं, त्याला बळी पडू नका. आपण या राज्यात पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक जिंकल्यास मुंबईत जल्लोष साजरा करू. त्यावेळी सर्वांना आमंत्रित केलं जाईल. 


उद्धव ठाकरेंनी यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दाखला दिला. बंगालच्या महिलेनं यांना नुकतंच गाढलं नाही तर नेस्तनाभूत करुन टाकलं असं मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात महाविकास आघाडी पॅटर्न 2.0 सुरू
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन रणनीती आखण्यात आली, त्याचपद्धतीनं राज्यसभा निवडणुकांसाठी पुन्हा मविआची एकजूट दाखवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. आज या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. अपक्ष आमदारांचं बळ मिळवण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत  12  अपक्ष  आमदार उपस्थित आहेत. भाजपच्या खात्यात किती अपक्ष हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात हे स्पष्ट आहे. पण सहा व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्यात आला आहे.