Lumpy skin disease: गाई गुरांमध्ये 'लम्पी' या संसर्गजन्य त्वचा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मुख्य मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली आहे. 'लम्पी’ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उदासीन आहे. त्यामुळे तातडीनं योजना तयार करत रितसर नियमावली जाहीर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकेतून केली असून ही याचिका न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सोमवारी सादर करण्यात आली. तेव्हा त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.
गाई गुरांमध्ये पसरणारा 'लम्पी' हा त्वचा रोग राज्यभरात सध्या झपाट्यानं पसरत असूनही राज्य सरकार याबाबत अद्यापही उदासिन का?, असा सवाल उपस्थित करत या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य सरकारनं याप्रकरणी परिपत्रक काढण्याशिवाय काहीही केलेले नाही, असा आरोप करत स्वाभिमान शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
'लम्पी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राण्यांतील संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार तातडीनं उपाययोजना करायला हव्यात. तसेच तातडीने पशुंमधील साथरोग नियंत्रण कायदा, 2009 नुसार कारवाई सुरू करण्याचीही मागणी शेट्टी यांनी याचिकेतून केली आहे. ही मुकी जनावर आपलं दु:ख बोलून दाखवू शकत नाहीत, त्यामुळे सरकारतर्फे याकडे दुर्लक्ष होत असून त्याबाबत काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. 'लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दुभत्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या