मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी अखेर सत्तेला राम राम ठोकणार आहेत. उद्या (30 ऑगस्ट) पुण्यात शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.

त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. एकंदरीतच खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते.

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यभर दौरे करुन ते संघटना बांधणीचं काम हाती घेणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढण्याचं काम हाती घेणार असून, सरकारला धारेवर धरणार असल्याचीही माहिती मिळते आहे.

एकीकडे देशभरातील पक्ष भाजपप्रणित एनडीएममध्ये सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची संघटना असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेते आहेत.

दरम्यान, पुण्यातील उद्याच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडण्यासोबतच आणखी काय भूमिका मांडतात आणि पुढील वाटचालीबाबत काय सांगतात, याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे.