मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भीमा-कोरेगाव घटनेवर भाष्य करणारं व्यंगचित्र रेखाटलं आहे. राज ठाकरेंनी आतापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शिवसेना यांच्यावर टीका करणारं व्यंगचित्र काढलं होतं. आज त्यांनी भीमा-कोरेगाव घटनेवर व्यंगचित्र काढले असून, ते फेसबुकवरील त्यांच्या अधिकृत पेजवरुन प्रसिद्धही केले आहे.

हे नवं व्यंगचित्र शेअर करुन, राज ठाकरेंनी त्यासोबत छोटेखानी पोस्टही लिहिली आहे. ही पोस्ट भीमा-कोरेगाव प्रकरणाशी संबंधित नसली, तरी त्यांनी त्यातून सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. राज ठाकरेंनी लिहिले आहे की, “सध्याच्या सरकारचे कर्तृत्त्वच असं की, व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.”



काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधणारं व्यंगचित्र काढून फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. त्यातून त्यांनी शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या भूमिकेवर टीका केली होती.

भीमा-कोरेगाव प्रकरणावर स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून घेतली नसली, तरी जाती-जातींमध्ये कशाप्रकारे राजकीय नेते लोकांना विभागत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

राज ठाकरेंच्या आजच्या व्यंगचित्राच्या कॅप्शनचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, राज ठाकरेंनी कॅप्शनमध्ये ‘फटकारे’ शब्द वापरुन, त्याला कोट केले आहे. आपल्याला माहित आहे की, ‘फटकारे’ नावाचा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित झाला होता.