आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2018 04:13 PM (IST)
आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
मुंबई: आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. मुंबईतील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. काल सरकारनं आयोजित केलेल्या तिरंग्या रॅलीदरम्यानच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी वृत्तपत्रांचं काम मोठं आहे. मात्र हल्लीच्या काळात अपवाद वगळता विचार करणारे किती पत्रकार शिल्लक राहिले आहेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. मुख्यमंत्री काय म्हणाले होते? विरोधकांकडून संविधान बचावचा ड्रामा सुरु असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीत केली. याच वेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांचा आवाज अचानक बसला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘मी आज जास्त बोलणार नाही. माझा आवाज बसला आहे. पण माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. कुणाचीही ताकद नाही.’