मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे मिरा रोड येथे लवकरच जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मिरा रोड- भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता. या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजल्यापासून ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती.  राज ठाकरे मिरा रोडला मराठी बांधवांशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.

मनसेनं मराठीच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे येत्या काही दिवसात मिरा भाईंदरला जाण्याची शक्यता आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसेकडून आक्रमक भूमिका घेत मोर्चा मिरा भाईंदरमध्ये काढण्यात आला होता, त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या मोर्चाचं आयोजन होऊ नये म्हणून मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मोर्चेकऱ्यांची आक्रमक भूमिका आणि सरकारच्या विरुद्ध वातावरण निर्माण होतंय हे लक्षात येताच अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं होतं.  

पहिली पासून हिंदी भाषा शिकवू नये यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. त्या मुद्यावर राज्य सरकारनं माघार घेतली होती.  मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता थेट राज ठाकरे रस्त्यावर उतरणार अशी शक्यता ही वर्तविण्यात आलेली आहे.याच पार्श्वभूमीवर लवकरच (येत्या काही दिवसात) राज ठाकरे मिरा रोड ला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.

मिरा भाईंदरमध्ये मनसेच्या वतीनं मराठीच्या मुद्यावरुन मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा आयोजित होऊ नये म्हणून मनसेच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. 

मिरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदली

मिरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर मनसेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मनसेच्या मोर्चाला मिरा भाईंदरचे त्यावेळचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी परवानगी नाकारली होती. मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या. यामुळं निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मिरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदल केली आहे.  मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.  त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.