Deepfake Videos : बॉलिवूड अभिनेत्रींचे काही दिवसांपूर्वी काही  डीपफेक फोटो (Deep Fake Photo)  आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल सर्वच स्तरातून भीती व्यक्त करण्यात येत होती. पुढे पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  देखील या व्हिडीओंचा उल्लेख केला होता. यानंतर आता डीपफेक फोटोवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray)  यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. डीपफेक  फोटो आणि व्हिडीओ प्रकरणी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. 


शर्मिला ठाकरे म्हणाल्या,  तुम्हाला विश्वास बसणार नाही या फेक व्हिडीओचा अनुभव मला आहे. माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. अनेक वेळा या संदर्भात मी स्वत: कमिशनरांना  तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते. मात्र  आपला कायदा तकलादू असून जो  ब्रिटिशकालीन आहे.त्यामुळे अटक केल्यानंतर त्यांना सोडण्यात येते. त्यामुळे  कायद्यात कुठेतरी बदल केला पाहिजे. विधानसभेने कायद्यात बदल केला पाहिजे तरच त्यावर उपाय निघेल. 


अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर


अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विविध प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या अभिनेत्रींना पाठिंबा देऊन या प्रकरणावर संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली होती. तसेच चिन्मयी श्रीपाद, नागा चैतन्य आणि  मृणाल ठाकूर  यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता. 


डीपफेक व्हीडिओ समाजासाठी धोकादायक, कृत्रीम बुद्धीमत्तेवर मोदींकडून देखील चिंता व्यक्त


 कृत्रीम बुद्धीमत्ता आणि त्याचा वापर करून बनवण्यात येणारे डीपफेक व्हीडिओ सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. याबद्दल पंतप्रधान मोदींनी जी-20 व्हर्च्युअल शिखर परिषदेत चिंता व्यक्त केली आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या वैश्विक नियमनासाठी आपण सर्वांनी मिळून पाऊलं उचलली पाहिजेत असं मोदी म्हणाले. डीपफेक व्हीडिओ समाजासाठी किती धोक्याचे आहेत, याचं गांभीर्य समजून घेणं देखील महत्त्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.


हे ही वाचा :


Deepfake Videos And Photos: तुम्हीही डीपफेकचे बळी ठरु शकता, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना काय काळजी घ्यावी? सायबर तज्ज्ञ म्हणतात..