ठाण्यात गुन्हा नोंदवलेल्या गोविंदा पथकांना राज ठाकरे भेटणार
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 09:30 AM (IST)
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. दहीहंडीच्या दिवशी गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची भेट राज ठाकरे घेणार आहेत. ठाण्यात 16 गोविंदा पथकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाड्यात मनसेने कायदेभंग दहीहंडीचं आयोजन केलं होतं. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं बक्षीस मनसेतर्फे जाहीर करण्यात आलं होतं. जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली. यावेळी पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबत आखून दिलेले नियम मनसेकडून पायदळी तुडवण्यात आले. चेंबुर, ठाण्यामध्ये मनसेने थरांचं बंधन धुडकावून लावत उंच दहीहंडी रचली. 20 फुटांच्या वर दहीहंडी बांधण्याला आणि 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागाला सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. कोर्टाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या जय जवान पथक आणि ठाण्यातील नौपाडामधील मनसेचे हंडी आयोजक अविनाश जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक भोसलेंना यासंदर्भातली नोटीस धाडली आहे.