मुंबई : नेहमी दरड कोसळणे आणि वाहतुकीच्या खोळंब्यामुळे चर्चेत असलेला मुंबई-पुणे महामार्ग आपली ओळख बदलण्याच्या तयारीत आहे. पुढच्या दोन वर्षात राज्य सरकार संपूर्ण महामार्ग 'डिजीटलाईज' करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

 
महत्त्वाच्या उपाययोजनांपैकी महामार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण हे रिमोट कंट्रोलद्वारे केलं जाणार आहे. तसेच एखाद्या वाहनाने वेगाची मर्यादा ओलांडल्यास त्याला रेडिओ संदेशाद्वारे पुढील चेकपोस्टवर पकडण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा महामार्ग सुरक्षित होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

 
डिजिटलायझेशन म्हणजे नेमकं काय?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची सुरक्षितता डिजिटल होणार आहे. एखाद्या सुसाट वाहनाने जर लेन कटिंग केली तर तत्काळ रेडिओ संदेशद्वारे चेकपोस्टला माहिती दिली जाणार आणि संबंधित वाहनचालकावर कारवाई होणार.

 

नजर सीसीटीव्हीची
संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. महामार्गावर अपघात झाला तर नेमके ठिकाण समजण्यासाठी तसंच एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमची स्थिती समजण्यासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरतील.

 

ड्रायव्हरलेस गाडीचीही सोय
आता ऑटोमॅटिक गिअरची गाडी आली आहे. भविष्यात ड्रायव्हरलेस गाडीही महामार्गावर धावेल. भविष्यातील मुंबई पुणे महामार्ग डिजीटल झाल्यावर ड्रायव्हरलेस गाडीही मार्गावरुन व्यवस्थित धावू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.