मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला रामराम ठोकल्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र रेखाटलं आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरुन राज ठाकरेंचं हे नवं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.


‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान!’ असे या व्यंगचित्राला नाव देण्यात आले असून, यात उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आणि आणखी एकजण दाखवण्यात आले आहे. तर खिडकीतून मोदी पाहत असल्याचे दिसत आहेत.



उद्धव ठाकरे चंद्राबाबूंकडे पाहत म्हणतात, “हॅss.. यात कसला आलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!”

चंद्राबाबू यांनी मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळून केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेरची वाट पकडली. काल यासंदर्भात निर्णय जाहीर करत चंद्राबाबूंनी एनडीएला मोठा धक्का दिला.

चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडल्याने सर्वत्र शिवसेनेची चर्चा सुरु झाली. कारण शिवसेनेने याआधी अनेकदा बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याच अनुशंघाने राज ठाकरेंने यावेळी व्यंगचित्र रेखाटले आहे.

राज ठाकरेंचे हे नवं व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.