गेली 4 वर्ष आम्ही भूमिका घेतोय. आता त्यांनी त्यांच्या राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला आहे. आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“चंद्राबाबूंनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते महिनाभरापासून पायाभरणी करत होते. जी गोष्ट आम्हाला पटत नाही, त्याविरोधात आवाज उठवायचा, हा धडा शिवसेनेने घालून दिला आहे. जेव्हा आम्ही त्याबाबत बोलत होतो, तेव्हा चंद्राबाबू आमच्यावर टीका करत होते. पण आता त्यांनी आमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, सरकारविरोधात आवाज उठवला. त्यांच्या राज्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी त्यांनी निर्णय घेतला. त्यांना जे योग्य वाटलं, ते त्यांनी केलं. मात्र त्यांच्या प्रेरणेचं मूळ महाराष्ट्रात, शिवसेनेकडे आहे हे चंद्राबाबूंनाही माहित आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना बाहेर पडणार का?
शिवसेना टीडीपीप्रमाणे सरकारमधून बाहेर का पडत नाही, असं विचारलं असता, राऊत म्हणाले, टीडीपी आणि शिवसेनेमध्ये फरक आहे. टीडीपी हा एनडीएमध्ये कायमस्वरुपी राहणारा पक्ष नाही. ते जाऊन येऊन असतात ना, लॉजवर जसं रुम घेतली, सोडली, तसा पक्ष टीडीपी आहे. ते कधी यूपीएमध्ये, कधी तिसऱ्या आघाडीत असतात. 2014 मध्ये मोदींची हवा होती. त्यामुळे ते एनडीएत गेले. जर ती हवा नसती तर देशात वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं.
सध्या ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या नात्याने त्यांनी केंद्राकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती, राजधानीसाठी मागणी केली होती. मात्र ती पूर्ण झाली नाही, त्यामुळे ते बाहेर पडले.
आता टीडीपी सोनिया गांधींच्या डिनरला जाणार आहे. मात्र असं तोडपाणी शिवसेनेने कधीच केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की ते त्यावर ठाम असतात. आम्ही 2019 मध्ये स्वतंत्र लढू अशी घोषणा त्यांनी केली आहे, आता नाही. त्यावेळी आम्ही स्वतंत्र लढू, आता टीडीपीने काय केलं म्हणून आम्हीही काही निर्णय घ्यावा, असं माध्यमांनी आम्हाला सांगू नये, असं संजय राऊत म्हणाले.
सध्या शिवसेना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. उद्धव ठाकरे देशभरातील राजकीय पक्षांना प्रेरणा देण्याचं काम करत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.