मुंबई : मनसेचं शिष्टमंडळ उद्या (21 मार्च) दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी मुलांचं शिष्टमंडळही सोबत असणार आहे.

आज राज ठाकरे यांनी रेल्वेतल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी प्रशिक्षणार्थींना भरती प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. साडेतीन तास आंदोलन केल्यानंतर रेल्वतील परीक्षार्थींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. एमआयजी क्लबजवळ आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्याआधी आंदोलकांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली.

आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करुन घेऊ, असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं.

सकाळपासून काय झाले?

तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं. सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.

सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं आंदोलन साडेतीन तासांनी मागे घेण्यात आलं.  येत्या दोन ते तीन दिवसात मागण्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन रेल्वेकडून अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन हटले.त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या, त्यापाठोपाठ लोकलही रवाना झाल्या.

दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक विचार झाला नाही, तर आजच्या प्रमाणे अचानक आंदोलन करु, असा इशारा अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी दिला.

20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी

पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या काय आहेत?

  • 20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.

  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं.

  • रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा.

  • याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये