मुंबई : तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं. सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.


या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. आंदोलनाविषयी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांशीही सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

अगोदर अप्रेंटिस भरतीसाठी 10 टक्के आरक्षण होतं, ते वाढवून 20 टक्के केलं. मात्र हे आरक्षण शंभर टक्के असावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अॅप्रेंटिसच्या उमेदवारांचा रेलरोको

रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मंगळवारी सकाळी 7 वा. मध्य रेल्वे ठप्प केली. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल झालं.

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या.

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत.

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. त्यांची भेट घेतली, पण गोयल यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलक विद्यार्थ्यांचा आहे.

रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या काय आहेत?

20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा

रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं

रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा
याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये

संबंधित बातमी :


अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार