मुंबई : देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात आयोजित सभेत राज बोलत होते. या सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजकीय स्ट्राईक केला.


राज ठाकरे आज भाषण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. राज यांनी आज जे आरोप केले, जे भाष्य केले, त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे सादर केले. राज यांनी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पुरावे सर्वांसमोर मांडले.



राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. राज म्हणाले की, "मोदी म्हणतात आपल्याकडे राफेल असतं तर खूप मदत झाली असती, असे म्हणून मोदींनी एअर स्ट्राईक करण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या आपल्या जवानांचा अपमान केला आहे. मोदी म्हणतात सीमेवरील जवानापेक्षा व्यापारी जास्त रिस्क घेतात, जवानांपेक्षा व्यापारी जास्त शूर असतात, असे बोलायला मोदींना लाज कशी नाही वाटली?"

राज म्हणाले की, "एअर स्ट्राईकवेळी भारताकडे राफेल विमान असतं तर खूप फायदा झाला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, असं बोलून मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचा अपमान करत आहेत. मोदी असं बोलून राफेल घोटाळा झाकू पाहत आहेत."

राज ठाकरे म्हणाले की, राफेल विमान चांगलंच असेल, आम्ही त्याबद्दल शंका घेत नाही. आम्ही विचारतोय की राफेलचं काम अनिल अंबानीला का दिलं?