मुंबई : आंदोलनं अर्धवट सोडतो अशी टीका मनसेवर माध्यमातून होते. मात्र कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं? मोबाईलवर मराठी, रेल्वेतील नोकऱ्या, मराठी पाट्या, हे मनसेचं यश मनसेमुळेच महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले. मात्र राम मंदिराच्या आंदोलनाचं काय झालं? राम मंदिराचा वाद कोर्टात आहे म्हणता, मात्र अमित शाह कोर्टातून सुटतात, मग राम मंदिराचा प्रश्न का नाही? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेने, पीडीपी, ओवेसी या सर्वांवर चौफेर घणाघात केला.

 

मनसेने आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशभरात सध्या सुरु असलेल्या अनेक विषयांवर तिरकस भाष्य केलं.

 

अमित शाह सुटतात, राम मंदिर का नाही?

मनसेवर आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करता, मग तुमच्या राम मंदिर आंदोलनाचं काय झालं? ज्या घोषणेवरून सत्तेत आला, त्या घोषणेचं काय झालं?  राम मंदिराचा मुद्दा कोर्टात आहे म्हणता, पण अमित शहांचा मुद्दा पण कोर्टातच होता, ते सुटले मग राम मंदिराचा मुद्दा का सुटत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

 

जे काँग्रेसच्या राज्यात, तेच मोदींच्या राज्यात

जी परिस्थिती काँग्रेसच्या राज्यात होती, तीच परिस्थिती मोदींच्या राज्यातही आहे. मोदींकडून लोकांना खूप आशा होती. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीही होत होत्या, आताही होत आहेत, मग त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक?, असंही सवाल राज यांनी विचारला.

 

आधी गुजरातचे तुकडे करा

सातत्याने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा सुरु आहे. संघाचीही तीच भावना आहे, मात्र महाराष्ट्राकडे पाहण्यापूर्वी आधी तुमच्या लाडक्या गुजरातचे तुकडे करा, असा सल्ला राज यांनी संघाला दिला.

 

तुकडे करायला महाराष्ट्र केक नाही


संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य हे महाराष्ट्राचे चार तुकडे करा म्हणतात, मात्र महाराष्ट्र काय तुमच्या वाढदिवसाचा केक आहे का? तुम्ही पृथ्वीवरून स्वतंत्र होण्याची वेळ आली, त्यामुळे विदर्भ-मराठवाडा स्वतंत्र करण्याची गोष्ट करू नका, असा घणाघात राज यांनी केला.

 

विदर्भ, मराठवाड्यातून अनेक नेते


यावेळी राज ठाकरे यांनी यापूर्वी विदर्भ- मराठवाड्यातून झालेल्या मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि सध्याच्या मंत्र्यांची यादी वाचून दाखवली. इतकी वर्षे पदं भोगूनही विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला नसेल, तर तो दोष त्या नेत्यांचा आहे, महाराष्ट्राचा नाही, असं राज म्हणाले.

 

शिवसेनेवर टीकास्त्र


शिवाजी पार्कात सभा घेणार म्हणून शिवसेनेच्या पोटात दुखू लागलं. यांची महापालिकेत, राज्यात, केंद्रात सत्ता, पण मनसेची सभा म्हटल्यावर हे घाबरले. हे सत्तेत आहेत पण तरीही विरोध करत असतात. जर इतकंच वाटत असेल, तर सत्तेतून बाहेर का पडत नाही? असा सवाल त्यांनी केला.

 


बाळासाहेबांचा आशिर्वाद माझ्या पाठिशी


दिग्गजांनी सभा घेऊन शिवाजी पार्क मैदाना गाजवलं. मात्र इथे आता अनेक अटी-शर्ती आहेत, मग सभा घ्यायच्या कुठे? त्यातच आमची सभा म्हटल्यावर शिवसेनेने फुटेज खाण्यासाठी त्यांचे झेंडेही लावले, मात्र ते झेंडे म्हणजे मी बाळासाहेबांचा आशिर्वाद समजला असं राज म्हणाले.

 


'अच्छे दिन'चं काय झालं?

मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी 100 दिवसात अच्छे दिन येतील असं म्हणत होते, मात्र आता किती दिवस उलटले? कुठे आहेत अच्छे दिन?  लोकांना तुम्ही का फसवता? असा सवाल राज यांनी विचारला.

 

काळा पैशाचं सोडा, भारतातला पैसा रोखा


यावेळी राज यांनी विजय मल्यावरूनही मोदी सरकारवर तोफ डागली. मोदी देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणणार होते. मात्र काळ्या पैशाचं जाऊ द्या, मल्या भारतातील पैसा घेऊन बाहेर पळाला, त्याला रोखा, असा सल्ला राज यांनी दिला.

 

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री


राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली.  देवेंद्र फडणवीस हा चांगला माणूस आहे. मात्र नुसतं चांगलं असेस, आणि काहीच करणार नसेल, तर अशा चांगूलपणाचा काहीच उपयोग नाही, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली.

 

मुख्यमंत्री शाळेतील मॉनिटरप्रमाणे


देवेंद्र फडणवीस हे वर्गातल्या मॉनिटरप्रमाणे आहेत. नुसतं बोलतात, करत काहीच नाहीत. खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण 'भारत माता की जय' म्हणणारच, असं फडणवीस म्हणतात, पण यांना खुर्ची सोडायला कोण सांगतंय? आणि भारत माता की जय म्हटल्यावर तुम्ही देशप्रेमी की देशद्रोही ठरवणार का? अशी विचारणा राज यांनी केली.

 

'भारत माता की जय' इंदिरा गांधी म्हणत होत्या

सध्या 'भारत माता की जय' वरून देशातील वातावरण ढवळलं आहे. मात्र मी लहान होतो, तेव्हा इंदिरा गांधी भाषणाच्या शेवटी 'भारत माता की जय' म्हणत होत्या, हे ऐकत आलोय, अशी आठवण राज यांनी सांगितली.

 

काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती का?


'भारत माता की जय'वरून देशभक्ती ठरवता, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या नेत्यांनी अफजल गुरुच्या फाशीविरोधात ठराव मांडला होता, त्यांनी त्याच्या प्रेताची मागणी केली होती, त्याच काश्मीरमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जातात, मग पीडीपीसोबत भाजपची युती का? असा सवाल राज यांनी विचारला.


ओवेसींवर टीकास्त्र

 

ओवेसी बंधू हे ह्यांनीच फायनान्स केलेले आहेत. ओवेसी इतके बरळतात, मग त्यांच्यावर केसेस का नाहीत? माझ्यावरच का?  गळ्यावर सुरा ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाहीत बोलतात, त्यांनी महाराष्ट्रात यावं, असं आव्हान राज यांनी दिलं.

 

सराफांना सरकारने फसवलं

भाजपने सराफांना फसवलं. ज्यावेळी काँग्रेसवाले कायदा करत होते, त्यावेळी भाजपने विरोध केला, मात्र सत्तेत आल्यावर भाजपने तेच केलं. त्यामुळे भाजपवाल्यांनी मोठा विश्वासघात केल्याची भावना सराफांची आहे. त्यामुळेच  'एकही भूल कमल का फूल' , असं आता सराफ म्हणत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

 

मनसेच्या झेंड्यातील रंगांचा अर्थ

 

यावेळी राज यांनी मनसेच्या झेंड्यातील रंगांचा अर्थ समजावून सांगितला. मनसेच्या झेंड्यात दिसणारा निळा रंग दलितांचं प्रतिक, भगवा हिंदुत्व आणि जो हिरवा रंग आहे तो डॉ एपीजे अब्दुल कलाम, ए आर रहमानसाठी आहे, भेंडी बाजार किंवा, भिवंडीसाठी नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

 

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ

यावेळी राज ठाकरे यांनी मंत्रालयाबाहेर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची आठवण करून देत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची सुसाईड नोट वाचून दाखवली. शेतकऱ्याचा शेवटचा संदेश वाचताना डोळ्यातून पाणी आल्याचं राज यांनी सांगितलं.

 

फडणवीस सरकार खोटं बोलतंय

 फडणवीस सरकार सातत्याने 'जलयुक्त शिवार'बद्दल बोलतंय. आता तर मुख्यमंत्री 33 हजार विहिरी बांधल्याचं  सांगतात, पण त्या विहिरी कुठे बांधल्या त्या दाखवा. जुन्या विहिरी दाखवू नका. जिथे पाण्याची गरज आहे, तिथे बांधल्या का, अशी विचारणा राज यांनी केली.

 

या सरकारला आता ना अधिकारी विचारत आहेत, ना जनता, असं राज म्हणाले.

रामदेवबाबांवर केस का नाही

रिक्षा आंदोलनाबाबत रिक्षा जाळा म्हटल्याचं माध्यमांनी सातत्याने दाखवलं, मग रामदेव बाबा गर्दन छाटा म्हणाले ते का नाही दाखवलं?-  ओवेसी इतके बरळतात, मग त्यांच्यावर केसेस का नाहीत? माझ्यावरच का? असं राज म्हणाले.


**************************

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

 

शिवजयंतीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंतीही जल्लोषात साजरी झाली पाहिजे:

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या की नाही याचा पत्ता नाही, मात्र चॅनल आणि वर्तमानपत्रांनी त्याबद्दल भरभरुन लिहिलं :
अनधिकृत इमारती अधिकृत करता? पण बिल्डरांना शिक्षा कधी करणार? त्यांच्यावर कारवाई का नाही होणार?

भूजला भूकंप झाला तेव्हा मुंबई-महाराष्ट्रातील गुजरातींनी पैशांची मदत केली,पण लातूरच्या भूकंपाला दिले नाही


बाहेरच्यांना पोसण्यासाठी इथल्या जनतेवर पाणीकपातीचं संकट ओढवलंय -


ओवेसी, रामदेव बाबावर केस नाही, पण राज ठाकरेवर केस : #राजठाकरे


रिक्षा जाळा म्हटल्याचं दाखवलं, मग रामदेवबाबा गर्दन छाटा म्हणाले ते का नाही दाखवलं?-  

देवेंद्र फडणवीस चांगला माणूस, पण अशा अजातशत्रूचा उपयोग काय? -

 

देवेंद्र फडणवीस बिनकामाचे, अशा चांगल्या माणसाचा उपयोग नाही -

 

 या सरकारला आता ना अधिकारी विचारतात, ना जनता -



 33 हजार विहिरी बांधल्याचं फडणवीस सांगतात, पण कुठे बांधल्या त्या दाखवा -


काँग्रेसच्या राज्यातही शेतकरी आत्महत्या होत्या, आज यांच्या राज्यातही होतात - 










 संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल,तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा -






तुम्हाला विकास जमत नसेल, तर खुर्च्या खाली करा -


मा गो वैद्य म्हणतात महाराष्ट्राचे 4 तुकडे करा, हा महाराष्ट्र म्हणजे केक आहे का तुकडे करायला? -


तीन मुख्यमंत्री विदर्भातून आले. असंख्य केंद्रीय मंत्री झाले. एवढं होऊन जर विदर्भाचा विकास झाला नाही तर त्याला महाराष्ट्राचा काय दोष?


LIVE : फडणवीस हे वर्गातल्या मॉनिटरप्रमाणे, राज यांच्याकडून फडणवीस यांची मिमिक्री -




LIVE : मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग हा भेंडी बाजार, भिवंडीसाठी नाही -


LIVE : मनसेच्या झेंड्यातील निळा रंग दलित, भगवा रंग हिंदुत्व आणि हिरवा रंग अब्दुल कलाम, ए आर रहमान यांच्यासाठी आहे - #राजठाकरे





LIVE : 100 दिवसात अच्छे दिन येणार होते, काय झालं? -


LIVE : मोदीं इतके परदेश दौरे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाने केले नाहीत -




LIVE : या देशाला मोदींसारखा पंतप्रधान हवा, हे पहिल्यांदा मी म्हटलं होतं -


LIVE : तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? -


LIVE : सराफांना भाजपने फसवलं, सराफ म्हणतात, 'एकही भूल कमल का फूल' -

 

LIVE : मोदींना पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा वाढदिवस लक्षात राहतो, ते तिथे जातात आणि इथे त्यांना शिव्या घालतात-


LIVE : भाजप किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, #राजठाकरे यांचा शिवसेनेला सल्ला





LIVE - जैतापूर आंदोलनाचं काय झालं? सत्तेत राहून विरोध करण्याचं सेनेचं नाटक -



LIVE : मनसेमुळे अधिकृत ६५ टोल बंद झाले आणि अनिधिकृत टोल तर कित्येक बंद झाले. मनसेमुळे मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळाला. रेल्वेच्या परीक्षा मनसेमुळे स्थानिक भाषेत सुरु झाल्या.







LIVE : मोबाईलवर मराठी, रेल्वेतील नोकऱ्या, मराठी पाट्या, हे मनसेचं यश -



LIVE : मनसेने अर्धवट सोडलेलं एक आंदोलन दाखवा, जे इतरांना अनेक वर्ष जमलं नाही, ते आम्ही आठवड्यात केलं -



LIVE : माध्यमांच्या कार्यलयातच फूट, कोणी सत्ताधाऱ्यांच्या बाजूचं, तर कोणी विरोधात -





LIVE : सेनेच्या झेंड्यांकडे बाळासाहेबांचा आशिर्वाद म्हणून पाहिले, बाळासाहेब माझ्या पाठिशी-



LIVE : दिग्गजांनी सभा घेऊन शिवाजी पार्क मैदाना गाजवलं,इथे अटी-शर्ती मग सभा घ्यायच्या कुठे?







LIVE : शिवसेनेची मनपात, राज्यात, केंद्रात सत्ता, मात्र यांना आमच्या सभेमुळे पोटदुखी :



LIVE : राज्यात सत्ता यांची, हे घाबरतात आम्हाला, राज यांचा सेनेला टोला :



LIVE : इथे विरोध, तिथे विरोध, मग सभा घ्यायच्या कुठे?: #राजठाकरे




LIVE : मनसेमुळे इतर पक्ष सण साजरे करायला लागले : #राजठाकरे



LIVE : बऱ्याच वर्षानंतर होमग्राऊंडवर आणि होमपिचवर खेळण्याची संधी मिळल्याबद्दल खेळायला सुरुवात करतोय: #राजठाकरे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणा सुरुवात



-----------------------------

मुंबई: आज शिवाजी पार्कवर होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा म्हणजे राज ठाकरेंसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे. कारण गेल्या काही वर्षांत मनसेच्या प्रमुख मावळ्यांनी राज ठाकरेंना पाठ दाखवली आहे. त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणि जोश फुंकण्याचं आव्हान  राज ठाकरेंसमोर आहे.

 

19 मार्च 2006 नंतर राज ठाकरे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा शिवतीर्थावरच्या अग्नीपरीक्षेसाठी तयार झाले आहेत. पण मनसेच्या स्थापना सभेला मराठी माणसानं प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

 

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राज ठाकरेंना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. मराठी पाट्यांच्या आंदोलनानं राज देशभरात पोहोचले. रेल्वेत स्थानिकांना संधी मिळावी म्हणून राज यांनी उत्तर भारतीयांना सळो की पळो करुन सोडलं. 'टोलचा झोल' असो की 'आदर्शचा घोटाळा' राज ठाकरेंनी प्रत्येक बॉलवर सिक्सर मारला. क्रिकेटमध्ये सचिनचं टायमिंग आणि राजकारणात राज यांच्या टायमिंगचे दाखले दिले जात होते. त्यामुळंच 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला तुडुंब यश मिळालं.

 

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, राम कदम, प्रकाश भोईर, मंगेश सांगळे, रमेश पाटील, रमेश वांजळे, अतुल भोसले, उत्तमराव ढिकले,  वसंत गीते आणि हर्षवर्धन जाधव. असे 13 आमदार निवडून आले.

 

भाजप आणि शिवसेनेपेक्षा मनसेचा कडवा विरोध त्यांना प्रमुख विरोधी पक्षाची जागा देऊन गेला. शिवसेनेचा मराठीचा मुद्दा मनसेनं हायजॅक केला आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही झाला.

 

2012 पर्यंत सगळं आलबेल होतं. 15 महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा राज ठाकरेंनी झंझावाती प्रचार केला. पुण्यात थेट 27 तर नाशिक पालिका बहुमतानं ताब्यात घेतली. मुंबईतही 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. आता राज ठाकरे 2014ला की फॅक्टर ठरणार अशी भाकीतं वर्तवली जाऊ लागली. पण तोवर पक्षात बेदिली, अविश्वास आणि कुरघोडीनं थैमान घातलं. अवघ्या दोन-तीन वर्षात राज ठाकरेंना प्रवीण दरेकर, राम कदम, वसंत गीते, हर्षवर्धन जाधव, रमेश पाटील यांनी रामराम ठोकला.

फाइल फोटो

राज यांचा करिश्मा ओसरला. मराठीचा मुद्दा मागे पडला. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर मांड ठोकली. भाजपमध्ये मोदी नावाचं वादळ आलं. ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचंही पानिपत झालं. राज ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका होऊ लागली. 13 वरुन राज ठाकरेंच्या आमदारांची संख्या थेट एकवर आली.

 

राज ठाकरेंचा ग्राऊंड कनेक्ट राहिला नसल्याची टीका झाली. राज यांचे महाराष्ट्र दौरेही अवकाळीप्रमाणं कधीतरी व्हायला लागले. मराठीचा मुद्दा पुन्हा शिवसेनेनं खिशात घातला. राज यांचा निवांतपणाच त्यांच्या पक्षाला महागात पडल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यामुळंच राज यांनी पुन्हा एकदा पक्षात प्राण फुंकण्यासाठी शिवतीर्थाची निवड केली आहे.

 

अपयशानंतर पुन्हा जिद्दीनं उभं राहण्यासाठी शिवतीर्थ राज ठाकरेंना आपलं म्हणणार का? महाराष्ट्र पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या पाठिशी उभा राहणार का? राज यांना राजकारणातला वरचा सूर पुन्हा गवसणार का? याचं उत्तर गुढीपाडव्याच्या सभेतून मिळेल.