मुंबई: मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईच्या गिरगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शोभायात्रा निघणार आहे. फडके गणेश मंदिरापासून ही भव्य शोभायात्रा निघेल.


 

20 फूट भारतमातेची प्रतिमा, 18 फूट महिषासूरमर्दिनीची प्रतिमा उभारण्यात आवी आहे. या शोभायात्रेत 1200 तरूण तरूणी ढोलताशांचा गजर करणार आहेत. तर तिकडे डोंबिवलीतही नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे. काल रात्रीपासूनचं डोंबिवलीत रस्त्यांवर रांगोळ्या पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडं तरूणींचं ढोलपथकही सज्ज झालं आहे.

 

डोंबिवलीच्या श्रीगणेश मंदिर संस्थानतर्फे मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी भव्य रांगोळीही साकारण्यात आली आहे. तब्बल 48 बाय 12 फुटांची ही रांगोळी असून त्यासाठी 700 किलो रांगोळी आणि 300 किलो रंग वापरण्यात आला आहे.

 

तर ठाण्याच्या गांवदेवी मैदानावर संस्कार भारतीतर्फे शंभर फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. राज्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश यावेळी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात येतो आहे. पाडव्यानिमित्त मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या डोंबिवली, पुणे आणि मुंबई परिसरातील स्वागतयात्रांनाही काही वेळात सुरुवात होणार आहे.