सरकार राज ठाकरेच्या हातात देऊन पाहा, असं आवाहनही त्यांनी केलं. ''शेतकऱ्यांच्या 21 मागण्यांची यादी पाहिली. एक मागणी मी तुमच्याकडे करतो. एकदा सरकार राज ठाकरेच्या हातात देऊन पाहा, मग त्यानंतर तुमच्या मागण्या अर्धवट राहतात का ते पाहा,'' असं राज ठाकरे म्हणाले.
''प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता दिली, भाजप-शिवसेनेला सत्ता दिली, पण शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांची किंमत ही केवळ मतापुरतीच केली जाते,'' असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला.
''चालत असताना पायातून आलेलं रक्त विसरु नका. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, कोणत्या झेंड्याखाली चालत आला आहात याचं घेणंदेणं नाही, फक्त शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी शक्य ते करण्यासाठी पक्ष म्हणून सैदव पाठीशी आहोत. ज्या वेळी हाक माराल, त्यावेळी राज ठाकरेकडून ओ येईल,'' अशी ग्वाही राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिली.
सर्वपक्षीय पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते. त्यानुसार राज ठाकरे यांनी मोर्चात सहभाग घेतला.
शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला. मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसने शेतकऱ्यांचं स्वागत केलं.
'शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.' असं चव्हाण म्हणाले.
आदित्य ठाकरेंची मोर्चेकऱ्यांशी चर्चा
कधी काळी डाव्यांचा जोरदार निषेध करणाऱ्या शिवसेनेने कम्युनिस्टांच्या नेतृत्वात निघालेल्या किसान मोर्चाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची हमी दिली.
ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.
शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला होता. शेकाप नेते जयंत पाटीलही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते.