ठाणे : ठाण्यात रविवारची सकाळ मॅरेथॉनमय बनली होती. ठाण्याच्या सांस्कृतिक कॅलेंडरमध्येही महत्त्वाचं स्थान मिळालेल्या या शर्यतीत यंदा पुरुषांच्या गटात ठाण्याच्या कालिदास हिरवेनं तर महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधवनं विजेतेपद पटकावलं. धावपटू ललिता बाबर यांच्यासह अनेकांची या मॅरेथॉनला विशेष उपस्थिती होती.


 
21 किलोमीटर पुरुषांच्या खुल्या गटात ठाण्याच्या कालिदास हिरवे यानं पहिला क्रमांक पटकावला. तर दुर्गा बुधा आणि पवन देशमुख हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर राहिले. 15 किलोमीटर महिलांच्या गटात नाशिकच्या संजीवनी जाधवनं पहिला, तर नाशिकच्याच मोनिका अथ्रेनं दुसरा आणि नागपूरच्या ज्योती चव्हाणनं तिसरा क्रमांक मिळवला.

 

 

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये यंदा वीस हजार स्पर्धक सहभागी झाले. पुरुष आणि महिलांच्या या मुख्य शर्यतींशिवाय विविध वयोगटांतील मुलामुलींसाठीही छोट्या पल्ल्याच्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं.  रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसची फायनल गाठणारी धावपटू ललिता बाबर आणि ऑलिम्पिक गाठणारा पहिला मराठी रोईंगपटू दत्तू भोकनळ यांच्यासह कान्हा या चित्रपटातील कलाकारांच्या टीमनं धावपटूंचा उत्साह वाढवला.

 

21 किमी पुरुष खुला गट

प्रथम क्रमांक- कालिदास लक्ष्मण हिरवे  (एलआयसी, ठाणे)
द्वितीय क्रमांक- दुर्गा बहाद्दुर बुधा (आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे)
तृतीय क्रमांक- पवन वामन देशमुख (आरएसएस महाविद्यालय, चंद्रपूर)

महिलांची 15 किमी स्पर्धा
प्रथम क्रमांक- संजीवनी जाधव, नाशिक
द्वितीय क्रमांक- मोनिका अथ्रे, नाशिक
तृतीय क्रमांक- ज्योती चव्हाण, नागपूर