मुंबई : ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली, त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. मुंबईत आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त 'शिवशाहीर सन्मान सोहळा' पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभूषण सन्मानावरुन झालेल्या वादावरही पुन्हा एकदा भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले की, ''शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांनी महाराजांचा इतिहास सांगितला. पण बाबासाहेबांनी ज्या महाराजांचा इतिहास सांगितला, ते विलक्षण आहे.''
बाबासाहेबांच्या टीकाकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, ''काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेले व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. ''
बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं, यावर खंत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ''बाबासाहेबांचा एकीकडे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव होतो. त्याच बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. त्यांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावं लागतं, यासारखं दुर्दैव नाही.''
शिवचरित्रासाठी बाबासाहेब पुरंदरेंनी घेतलेल्या कष्टाचा गौरव करताना राज ठाकरे म्हणाले की, ''महाराजांच्या इतिहासाबद्दल बाहेरच्यांनी (इतर देशातील इतिहासकारांनी) जे लिहून ठेवलंय, त्यावर अध्ययन करुन, एक सोपा इतिहास महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला. महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी बाबासाहेबांशिवाय इतर कोणीही तसे प्रयत्न केले नाहीत. त्यांना ते प्रयत्न करायचे नाहीत. त्यांना केवळ आरोप करायचे असल्याचं त्यांनी सांगितंल.
किल्ले रायगडवर घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ देऊन राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''बाबासाहेबांना त्या मुलाखतीत मी एक प्रश्न विचारला होता की, महाराजांचा 50 वर्षांचा इतिहास लिहावा वाटला. पण पेशव्यांचा 125 वर्षांचा इतिहास लिहावा वाटला नाही, या मागचं कारण काय?' त्यावर बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं, त्यासाठी मोठी हिंमत असण्याची गरज आहे. कारण बाबासाहेब म्हणाले होते की, 'पेशव्यांनी केलेल्या चुका महाराष्ट्राला सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी करुन ठेवलेल्या अचूक गोष्टी महाराष्ट्राला सांगव्यात असं मला वाटतं.' अशा माणसाभोवती जातीपातीची भूतं नाचवताय तुम्ही, यासारखं दुर्दैवं कोणतंही नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागणं दुर्देव : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2017 11:09 PM (IST)
ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली, त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं, हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -