मुंबई : "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन," अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. गुरुवारी (22 ऑगस्ट) अंमलबजावणी संचालनालयाकडून राज ठाकरे यांची तब्बल साडेआठ ते नऊ तास चौकशी झाली. काल सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यात पोहोचलेले राज ठाकरे रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर आले. चौकशीनंतर राज ठाकरे कृष्णकुंजवर पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.


ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी राज यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु राज यांनी बोलणं टाळलं. कुटुंबीयांसमवेत ते थेट कृष्णकुंजकडे रवाना झाले. इथे मनसेचे नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कृष्णकुंजबाहेरही माध्यमांनी राज यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही बोलले नाहीत. परंतु चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना राज यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. राज म्हणाले की, "या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन."


दरम्यान, याप्रकरणातील राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली असून, गरज पडली तरच राज यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पाहा काय म्हणाले राज ठाकरे?



कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी राज ठाकरेंवर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती केली, त्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरं दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान राज ठाकरेंची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असताना त्यांचे कुटुंबीय आणि मनसे कार्यकर्ते दिवसभर ईडी कार्यालयाबाहेर उभे होते.

राज ठाकरेंच्या चौकशीतून काय बाहेर येणार?