मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विविध पक्षांच्या यात्रांचे पीक आले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्याची भर पडणार आहे. सुप्रिया सुळे राज्यात संवाद दौरा करणार आहेत. 23 ऑगस्टपासून या दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. ह्यात सहा जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत.


राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सरकारचा ढिसाळ कारभार या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यांतील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा दौरा असल्याची माहिती आहे.

संवाद दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात 23 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीने याआधी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे फिरत असताना मात्र सुप्रिया यांचा वेगळा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू होणार आहे.

'मुंबई बन गई खड्डे का अड्डा', आजपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष अभियान  
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.   'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेला टॅग करणार आहेत. त्यातील किती खड्डे बुजवले, नाही बुजवले हे प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

#KhaddeKaAdda #MumbaiPotholes या हॅशटॅग खाली हे अभियान राबवण्यात येणार आहे. जनतेने या मोहिमेत सामील झाले पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले.  मुंबई महानगरपालिकेने 400 ते 500 खड्डे मुंबईत असल्याचा दावा केला होता. मात्र मुंबईत 25 हजारच्या आसपास खड्डे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आजपासून महापालिकेला टॅग करण्याचे अभियान सुरू होणार आहे. यामुळे खड्ड्याचे सोशल ऑडिट पण होईल. ही मोहीम जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरु करत आहोत. जर कारवाई झाली नाही तर वॉर्डनुसार आंदोलन करू असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.