मुंबई : भारताने आज तीन मिनिटात सॅटेलाईटचा वेध घेणारे A-SAT हे क्षेपणास्त्र लॉन्च केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कामगिरीची माहिती दिली. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन याबाबतची माहिती देण्याची आवश्यकता नव्हती, हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे, त्याचे श्रेय त्यांनाच मिळायला हवे."


भारताने आज A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे आपला देश आता अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत भारतीय शास्त्रज्ञांच्या मिशन शक्ती या मोहीमेची माहिती दिली. यावरुन विरोधकांसह राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे, ते त्यांना सांगू द्या. त्यांना प्रसिद्धी मिळू द्या,''