ठाणे : जातविषयक आरक्षणाला माझा ठाम विरोध असून जातीवर आधारित आरक्षण रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. केवळ आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाला मान्यता द्यावी, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी ठाण्यातील
मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं.
आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करायचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केला. सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे, हे जनतेकडून मत काढण्याचे प्रयत्न आहेत, जर आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असेल, तर अडतं कुठे? असा सवालही त्यांनी केला.
पवारांनी 15 वर्ष आरक्षण का नाही दिलं?
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, असं विधान केलं, मग 15 वर्ष सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने ते का नाही दिलं नाही, असा प्रश्नही राज यांनी विचारला. मला जातपात कळत नाहीत, मी जातपात मानत नाही, इथे कोणत्या जातीची
माणसं उपस्थित आहेत, त्याच्याशी मला देणंघेणं नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्रात मराठा समाजाचा इतके मंत्री झाले, पण कोणीही काही केलं नाही, असा आरोपही राज यांनी केला.
जातविषयक आरक्षणाला विरोध
जातविषयक आरक्षणाला माझा ठाम विरोध आहे, जातीवर आधारित आरक्षण रद्द करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. समाजातील प्रत्येकाला केवळ आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण द्या, असंही ते म्हणाले. आरक्षण मागताय, पण नोकऱ्या आहेत कुठे? असं विचारत उद्योगधंद्यात 100 टक्के मराठी मुलं पाहिजेत, अशी इच्छाही राज यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेला टोला
शिवसेनेने आधी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी, या शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
मराठा मोर्चे सर्वात शिस्तबद्ध
देशाच्या मुद्दयावर सर्व राजकीय पक्ष एकजुटीने उभे राहिले, याचं कौतुक वाटत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. मराठा समाजाचे मोर्चे हे देशाच्या इतिहासातले सर्वात शिस्तबद्ध मोर्चे आहेत, असं कौतुकही राज यांनी केलं.
देशापुढे कोणीही मित्र नाही
सलमान खानविषयी मी बोलणार नाही, असं सगळ्यांना वाटलं, पण देश आणि महाराष्ट्रापुढे कोणीही माझा मित्र नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कुठलीही भूमिका घेत नाही, प्रत्येकवेळी निवडणुकांसाठी मी राजकारण करत नाही, अशी पुस्तीही राज यांनी जोडली.
अॅट्रोसिटीच्या दुरुपयोगाचीच शक्यता अधिक
अॅट्रोसिटी कायद्यातील तरतुदी पाहता, दुरुपयोग होण्याच्या शक्यता जास्त आहेत, अशी भीतीही राज यांनी व्यक्त केली. कायदा हा धमकीचा विषय होऊ शकतो का, असा प्रश्न विचारताना सगळ्या समाजाच्या लोकांनी सर्व राजकारण्यांना लाथा मारुन बाहेर काढलं
पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
परप्रांतातून येणारे लोंढे हे सर्वाधिक ठाणे भागात स्थिरावतात, असा दावा राज ठाकरेंनी केला. महापालिकांच्या संख्या वाढवण्याला परप्रांतीय जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.