मुंबई : कार्यकर्त्यांनी आता घराघरात जावे आणि मतदार याद्या तपासाव्यात. त्या ठिकाणी जर दुबार-तिबार मतदार दिसला की त्याला तिथेच फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. हे असे मतदान चोरून सत्तेवर आले, दुबार-तिबार मतदान करून निवडून आले. मग उन्हात उभे राहून मतदान करणाऱ्याच्या मताला काही किंमत आहे की नाही असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला. मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' (Mumbai Satyacha Morcha) काढण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असताना निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025 च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली. निवडणूक आयोग पुरावे मागतो असं सांगत त्यांनी पुराव्याचा गठ्ठाच समोर आणला.
Raj Thackeray On Bogus Voter : कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?
मुंबई उत्तर - 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)
मुंबई उत्तर पश्चिम - 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)
मुंबई उत्तर पूर्व - 92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)
मुंबई उत्तर मध्य - 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)
मुंबई दक्षिण मध्य - 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)
मुंबई दक्षिण - 55,205 दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)
नाशिक - 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)
मावळ - 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)
पुणे - 1,02,002 दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)
ठाणे - 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)
Malbar Hill Bogus Voters : मलबार हिलमध्ये साडे चार हजार दुबार मतदान
कल्याण ग्रामीण, भिवंडी, डोंबिवली या ठिकाणच्या साडे चार हजार मतदारांनी मुंबईच्या मलबार हिलमध्ये मतदान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं. मग जो खरा मतदार दुपारी उन्हात उभारून मतदान करतो त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
Raj Thackeray Mumbai Speech : 'दुबार-तिबार' वाले दिसले तर फोडून काढा
मतदान याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्याचं राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. ते म्हणाले की, "आता तुम्ही घराघरात जा. याद्यांवरील जे मतदार आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजेत. ती माणसे मतदार आहेत याची खात्री करा. त्यामध्ये जर दुबार-तिबार वाले आले तर तिथेच फोडून काढायचं. त्यांना बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत."
ही बातमी वाचा: