मुंबई : मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई दक्षिणमध्ये 9.39, मुंबई पूर्व 20.62 आणि मुंबई पश्चिममध्ये 20.91 इतक्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभरही मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे.
कालच हवामान खात्याने येत्या तीन-चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 21 तारखेपासून पावसाचा जोर वाढेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे संचालक एन. चट्टोपाध्याय यांनी दिली.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून, धरणक्षेत्रातही पाणी वाढत आहे.
दरम्यान, धुळ्यासारख्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडल्याचेही चित्र आहे. त्यामुळे एकीकडे धुंवाधार पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे कमी पावसाचीही परिस्थिती आहे.