पालघरमध्ये तुफान पाऊस
पालघरमधल्या विक्रमगडमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 324 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इथल्याच तलासरी तालुक्यात तब्बल 468 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसानं सगळीकडं पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे.
संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं असून, आज पहाटे 4 वाजल्यापासून इथली वाहतूक ठप्प आहे. तर गेल्या 20 तासापासून विक्रमगड परिसरातला वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
भिवंडीतही पावसाची रिपरिप
भिवंडीतही रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसामुळं रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. अजूनही भिवंडीत काही परिसरात रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे नाल्यातलं पाणी रस्त्यावर आलं आहे. यातून मार्ग काढताना भिवंडीकरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अंबरनाथमध्ये संततधार पावसानं नगरपालिकेच्या कामांचा धुव्वा
दुसरीकडं अंबरनाथमध्ये रात्रभरापासून चांगलाच पाऊस कोसळतो आहे. मोठ्या विश्रांतीनंतर काल रात्री इथं पावसानं हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळं बीकेबिन परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळं नपानं केलेल्या कामांचा धुव्वा उडाला.
उल्हासनगर आणि नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग
याशिवाय उल्हासनगरमध्ये पावसानं चांगलीच बॅटिंग केली. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी वाहतूक धीम्या गतीनं सुरु होती. नवी मुंबईतही रात्रभरापासून वरुणराजा बरसतो आहे. रात्री इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सकाळीही जोरदार पाऊस सुरु होता.