बदलापूरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2017 09:53 AM (IST)
बदलापूर आणि परिसरात काल (गुरुवार) रात्रीपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळीच रेल्वे रुळावर पाणी साचणं सुरु झालं आहे.
बदलापूर : मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी आज (शुक्रवार) पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बदलापूरमध्येही काल रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. दरम्यान, आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमोडलं आहे. बदलापूर आणि परिसरात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळीच रेल्वे रुळावर पाणी साचलं. सध्या तरी हे पाणी कमी प्रमाणात आहे. मात्र, पावसानं आपला जोर कायम ठेवल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक लोकल ट्रेन उशिरानं धावत आहे. दुसरीकडे राज्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात रात्री जोरदार पाऊस बरसला. तर डोंबिवली, कल्याण शीळफाटा भागात वीजांचा गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर नवी मुंबईतल्या ऐरोली भागात मुसळधार पाऊस झाला. संबंधित बातम्या : फलटण-बारामती रस्त्यावरचा सोमंथळी पूल वाहून गेला LIVE: मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस