मुंबई : मुंबई उपनगर आणि परिसरात 29 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबईकरांनी एकमेकांची मदत तर केलीच, मात्र या पावसात सच्चा मित्र होऊन आलेल्या मुंबई पोलिसांच्या पाठीवर राज्य सरकार कौतुकाची थाप देत आहे. पावसात राबलेल्या पोलिसांना 5 कोटी रुपयांचं इनाम राज्य सरकारने जाहीर केलं आहे.

29 ऑगस्टच्या पावसात जनतेच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहिलेल्या आणि गेल्या काही महिन्यात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून हे पारितोषिक देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव (25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर) आणि बकरी ईद (2 सप्टेंबर) या कालावधीत जातीय सलोखा राखल्याबद्दलही सरकारने पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

गृह मंत्रालयाने हा ठराव काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस महासंचालकांना बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांमध्ये पारितोषिकाची रक्कम वाटून दिली जाणार आहे. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीतील त्यांच्या कामाचा विचार करुन हे बक्षीस देण्यात येईल.

29 ऑगस्ट रोजी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळातही शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांचा मोठा वाटा असल्याचं सरकारने म्हटलं.