मुंबई: म्हाडाने आपल्या 819 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 16 सप्टेंबरपासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. तर 10 नोव्हेंबरला लॉटरी जाहीर होईल.


विविध गटांसाठी म्हाडाने घरं राखीव ठेवली आहेत. त्यामध्ये विविध जाती, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सैनिक, अंध-अपंग अशा विविध कॅटेगरी आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आजी-माजी आमदार-खासदारांसाठी राखीव घरं.

म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं?

म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पन्न गटाची मर्यादा 25 हजार ते  50 हजार रुपयांची असूनही, या गटात आमदारांसाठी 4 राखीव घरं ठेवण्यात आली आहेत.

एकीकडे आमदारांचे पगार हे गेल्या वर्षीच सचिवांइतके म्हणजेच सुमारे दीडलाख रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाने निदान सरकारच्या त्या विधेयकाकडे पाहून तरी, आमदार-खासदारांना अल्प उत्पन्न गटात राखीव घरं ठेवायला नको होती. पण म्हाडाने सरकारच्या विधेयकाकडे कानाडोळा केल्याचं दिसून येतंय. 

एकीकडे मुंबईत लोकांना राहायला घरं नाहीत. अनेक लोक रस्त्यावर, फूटपाथवर किंवा झोपड्यांमध्ये गुजराण करतात. मात्र आमदारांना वेतन,भत्ता, रेल्वे,एसटी, रुग्णालयात सूट असते. शिवाय आमदारांसाठी मुंबईत सुसज्ज आमदार निवास, मंत्र्यांना बंगले, आमदारांच्या अनेक सोसायटी आहेत, मात्र तरीही त्यांना म्हाडाने घरं आरक्षीत केली आहेत.

आमदारांसाठी आरक्षित घरं

अल्प उत्पन्न गट :

कन्नमावर नगर- 3 घरं , किंमत प्रत्येकी 35 लाख

चारकोप कांदिवली – 1 घर , किंमत 35 लाख

मध्यम उत्पन्न गट :

सिद्धार्थनगर, गोरेगाव,  2 घरं – किंमत प्रत्येकी 56 लाख

उन्नत नगर गोरेगाव, 1 घर - किंमत प्रत्येकी 41 लाख

चारकोप कांदिवली, 1 घर, किंमत 42 लाख

चारकोप कांदिवली,1 घर – किंमत 37 लाख

उच्च उत्पन्न गट

लोअर परेल, 1 घर – किंमत 1 कोटी 43 लाख

तुंगा पवई- 4 घरं – किंमत प्रत्येकी 1 कोटी 40 लाख

चारकोप कांदिवली, 1 घर –  किंमत 73 लाख

शिंपोली कांदिवली, 1 घर - किंमत 75 लाख

 म्हाडाच्या घरांसाठी  कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :

  • अत्यल्प उत्पन्न गट –  25,000

  • अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये

  • मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये

  • उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त


आमदारांचे पगार (ऑगस्ट 2016 नुसार)

आमदार –1 लाख 60 हजार ते 1 लाख 70 हजार

राज्यमंत्री –1 लाख 79 हजार ते 1 लाख 99 हजार

कॅबिनेट मंत्री – 1 लाख 80 हजार ते 2 लाख

संबंधित बातम्या

मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर

म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं?