मुंबई : मुंबईसह कोकणात पावसाचा रेड अलर्ट आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणात सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोल्हापूर साताऱ्यातील घाट परिसर आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र सध्या पावसानं उसंत घेतली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत होता. परंतु, आज पावसानं विश्रांती घेतली आहे. तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. आज तीन दिवसानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मुंबईच्या मुसळधार पावसात एक नाही, दोन नाही... तर तब्बल 400 गाड्या पाण्याखाली
दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतला आहे. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलं आहे. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील कांदिवली भागात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या.
मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला. वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की आपण कशासाठी पैसे मोजले होते? असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार.
भांडुप जलशुद्धीकरण संकुलाभोवती बांधणार पूर प्रतिबंधक भिंत बांधणार
तीन दिवसांपासून मुंबईत पाणीपुरवठा विस्कळीत आहे. याचं कारण म्हणजे भांडूप जलशुद्धीकरण संकुलात तुंबलेलं पाणी. तलाव आणि धरणांमधील पाणी शुध्द करुन मुंबईला पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात पाणी तुंबल्याने संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा खंडित करावा लागला. भांडूप परिसरात 1 जुलैच्या रात्रीनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली आहे.
संपूर्ण संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यासाठी उद्यान प्रशासनाकडे निवेदन देण्याबाबत निर्देश दिले आहेत. भांडुप जलशुद्धीकरण संकूल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते.