मुंबई : दोन दिवसांपासून मुंबईत पाणीपुरवठा विस्कळीत आहे. याचं कारण म्हणजे भांडूप जलशुद्धीकरण संकुलात तुंबलेलं पाणी...तलाव आणि धरणांमधील पाणी शुध्द करुन मुंबईला पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात पाणी तुंबल्याने संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा खंडित करावा लागला. भांडूप परिसरात 1 जुलैच्या रात्रीनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली आहे.
महापालिका प्रशासनाचे निर्देश काय?
संपूर्ण संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यासाठी उद्यान प्रशासनाकडे निवेदन देण्याबाबत निर्देश दिले आहेत. भांडुप जलशुद्धीकरण संकूल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते.
संकुलातील दोन पैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1, 910 दशलक्ष लीटर तर दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 900 दशलक्ष लीटर इतकी आहे. अशा या महत्त्वाच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलात पावसाचे पाणी शिरल्यानंतर संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आणि संयंत्रे सुरक्षित राखण्यासाठी विद्युत पुरवठा देखील बंद करावा लागला.
परिणामी मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानंतर पाणीपुरवठा बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलाच्या आतील रचना, बाहेरील परिसर, संयंत्रांची ठिकाणं इत्यादींचे निरीक्षण केल्यानंतर वेलरासू यांनी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्रामुख्याने, संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत उभारणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून भांडूप संकुलामध्ये शिरणारे पावसाचे पाणी तुळशी तलावामध्ये वळते करुन पूरस्थिती टाळता यावी यासाठी, विशेष प्रवाह मार्ग / नाला बांधण्याची विनंती अभयारण्याचे संचालक यांच्याकडे करणे, संकुलातील मुख्य जलप्रक्रिया इमारतीभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे आणि संकुल व परिसरातील पर्जन्य जल निःसारण प्रणालीची क्षमता वाढवणे असे निरनिराळे निर्देशही यावेळी वेलरासू यांनी दिले. तसेच या सर्व निर्देशांवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली.
भांडुप जलशुद्धीकरण केंद्र बंद का पडले?
भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. परिणामी मुंबईचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली, त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करुन उदंचन करणारे पंप टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आले आणि रविवारी सायंकाळपासूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.