Mumbai Rain Update: मुंबईत आजही जोरदार पाऊस सुरूच आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मोठा पाऊस होऊनही ज्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं नव्हतं, तिथं आज मात्र पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याशिवाय माटुंग्यातही पावसाचं पाणी साचलं आहे. तसेच दादरच्या पारसी कॉलनीतही आज पाणी साचलं आहे. मुंबईत पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात मुंबई कुलाबा येथे 84 मिमी तर सांताक्रूझ येथे 193.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सब वे टिळक नगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत पालिकेच्या (BMC) नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये NDRF च्या 3 टीम या आधीच तैनात आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 2 अतिरिक्त टीम अशा एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


ठाणे 


ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 93.9 मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सकाळी 8 वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी 12.90 मीटर एवढी होती. तर नदीची इशारा पातळी 16.50 मोटर तर धोका पातळी 17.50 मीटर एवढी आहे. जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात 2 NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता 


पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाद्वारे देण्यात आला आहे. मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.