Mumbai, Thane Rain Updates : मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरांत पावसाचं पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसानं दडी मारल्यामुळे अनेक दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते. अशातच, आज कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबई (Mumbai Rains), ठाण्यासह (Thane Rain Updates) कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि नवी मुंबईत पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. अद्याप वाहतूक सुरळीत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा तूर्तास सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे.                                                                


मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून पुन्हा मुंबईसह पश्चिम उपनगरात अधून मधून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरवलीकडून वांद्रेच्या दिशेनं जाणारा मार्गावर गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले यादरम्यान मोठे वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 


दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


देशात सरासरीपेक्षा 4 टक्के जास्त पाऊस


देशात निम्म्याहून अधिक मान्सूनचा हंगाम संपला असून आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. 1 जून ते 19 ऑगस्ट या कालावधीत देशात 603.9 मिमी पाऊस पडतो, यावेळी 627.0 मिमी पाऊस झाला आहे. अहवालानुसार 4 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत फक्त तामिळनाडूमध्येच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याच वेळी राजस्थान, गोवा, सिक्कीम, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याशिवाय 15 राज्यांमध्ये सामान्य पाऊस झाला असून 5 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगाल, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरासह देशातील अनेक राज्यांमध्ये काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.