मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2018 09:08 AM (IST)
जोरधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरानं धावत आहेत.
मुंबई: रात्रीपासून सुरु असलेल्या जोरधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरानं धावत आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या या रडगाण्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. संततधार पावसामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून याचा फटका प्रवाशांना बसतोय. दोनच दिवसांपूर्वी अंधेरीतील गोखले पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वे दिवसभर ठप्प होती. त्याचा परिणाम मध्य आणि हार्बर रेल्वेवरही झाला होता. इतकंच नाही तर रस्ते वाहतूकही संथ झाली होती. त्यानंतर आज पावसाचा जोर कायम असल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वे मात्र तुलनेने सुरळीत आहे. रायगडमध्ये दरड कोसळली मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाडनजीक केंबुर्लीजवळ ही दरड कोसळली. यामुळे मुंबई गोवा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्यामुळेच ही दरड कोसळल्याचं सांगितलं जात आहे. पण सुदैवाने दरड कोणत्याही वाहनावर न कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.