मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे,  मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पाऊस इतका जोरदार बरसतोय, की दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेला आहे.


दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सोमवारी पावसाने सुरु केलेली बॅटिंग सुरुच आहे. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रीय राहणार असून, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनची स्थिती काय आहे?

गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या.

येत्या 24 तासात कोकण गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

आतापर्यंत पडलेल्या पावसाची विभागवार आकडेवारी

कोकण विभागात सरासरी ८१८.९ मिमी पाऊस होतो. तिथे १०७३.७ मिमी म्हणजे सरासरीच्या ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरी १६७.८ मिमी पाऊस पडतो. तिथे सरासरी इतकाच म्हणजे १६७ मिमी पाऊस झाला.

मराठावाड्यात सरासरी १५९.१ मिमी पाऊस होतो. तिथे १९१ मिमी म्हणजेच २० टक्के जास्त पाऊस झाला.

तर विदर्भात सरासरी १९५.३ मिमी पाऊस होतो. तिथे २१३.४ मिमी म्हणजेच ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

संपूर्ण राज्यात सरासरी २३६.१ मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा २७४.९ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे.